कोथरूड मधील महादेव मंदिरात चोरी; चोरटे रंगेहाथ गजाआड
Thursday, Aug 10 2017 6:17PM    Checkmate Times
Tags: kothrud shiv mandir, mahadev temple kothrud, cash theft for temple, temple thief, religious crime, kothrud police, kothrud crime, kothrud news 1000005470

श्रावणी सोमवारच्या रेकीनंतर दानपेटीवर डल्ला

सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरटे गजाआड

 

पुणे, दि.१० (CTNN): सद्या महाराष्ट्रभर विविध देवस्थानांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसत असून, त्याचे पुणे जिल्ह्यात देखील लोन पसरले आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी मधील महालक्ष्मी मंदिरात शिरून देवीचे सोन्याचे दागिने चोरणे, दत्तवाडी म्हसोबा मंदिरातील देवाचे सोन्याचे डोळे चोरणे, विविध मंदिरांमध्ये चोरटे डल्ला मारत आहेत. त्यातून कोथरूड मधील महादेव मंदिर देखील सुटले नसून, मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना ताब्यात घेण्यात कोथरूड पोलिसांना यश आले आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार बापु गायके (वय १९) आणि समीर सिकंदर राऊत (वय २०, दोघेही राहणार – कोथरूड, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून, त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. याप्रकरणी अनिल विश्वास परांजपे (वय ४०, रा. शुभंकर सोसायटी, कोथरूड, पुणे) यांनी कोथरूड पोलिसात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पांढरे तपास करत आहेत. सदरील घटना काल बुधवार (दि.९) पहाटे सव्वाचार वाजता घडली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

कोथरुड परिसरातील भेलके नगर चौकात शुभंकर सोसायटी असून, सोसायटीच्या आवारात राजेंद्र मोहिते (रा.पद्मावती) यांच्या खाजगी मालकीचे प्राचीन शुभंकर श्री महादेव मंदिर आहे. सध्या श्रावण महिना असल्याने या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. येणारे भाविक मंदिरातील दानपेटीत श्रध्देने दान करीत असतात. त्याच दानपेटीवर लक्ष ठेवून आरोपींनी बुधवार (दि.९) पहाटे सव्वाचारच्या सुमारास मंदिराच्या दरवाजास लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश करत, कटरच्या सहाय्याने दानपेटी उचकटून त्यातील १९ हजार ८७७ रुपये चोरले.

 

मात्र चोरी करून पळून जात असताना, या सोसायटीतील रंजन शुक्ला या एकट्या सुरक्षारक्षकाने त्यांचा पाठलाग करून, त्यातील दोघांना रंगेहाथ पकडले. यावेळी गायके आणि राउत यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. यावेळी झालेल्या आरडाओरड्यानंतर रहिवाश्यांनी पोलिसांना बोलावून घेत, आरोपींना कोथरूड पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी त्यांच्याकडून रोख १९ हजार ८७७ रुपये हस्तगत केले आहेत. यापूर्वीही कोथरूड परिसरात झालेल्या घरफोड्यामध्ये आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता कोथरूड पोलिसांनी वर्तवली असून, त्यादृष्टीने देखील तपास सुरु असल्याचे कोथरूड पोलिसांनी सांगितले.

 

मात्र पुण्यात इतर मंदिरांमध्ये झालेल्या चोऱ्यांचा तपास कुठपर्यंत आला आहे? सीसीटीव्ही फुटेज मिळालेल्या मंदिरातील चोरट्यांना गजाआड करण्यात यश आले का? सीसीटीव्ही लावले म्हणजे मंदिरे सुरक्षित झाली का? अशा गुन्ह्यातील आरोपींना काय शिक्षा होते आणि त्याला किती वेळ जातो? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र अशा आरोपींमुळे नाहक समाजजीवन वेठीस धरले जाऊ शकते, याचा विचार करत, पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत भाविक भक्तांमधून व्यक्त होते आहे.

 

छायाचित्र: मंदिर आणि चोरट्यांनी फोडलेली दानपेटी

वाचक आपले मत खालील प्रतिक्रिया कप्प्यात व्यक्त करू शकतात. त्यात नाव आणि शहराचे नाव शक्यतो इंग्रजी मध्ये टाका.

 

9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000130