वारजे माळवाडी मधील ‘त्या’ प्रकरणात सहा पोलीस निर्दोष
Saturday, May 12 2018 10:39AM    CHECKMATE TIMES
Tags: Police innocent, Accused death, The result of the court, warje police, Police custody death, amol kuchekar 1000006701

पुणे, दि.१२ (चेकमेट टाईम्स): चोरी प्रकरणातील आरोपीचा वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये मृत्यू झाल्यानंतर, वारजे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामधून सहा पोलिसांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे (DB) तत्कालीन उपनिरीक्षक रामदास राजाराम शेळके, पोलीस हवालदार रामचंद्र दत्तात्रय कोरे, पोलीस शिपाई महेश रामदास कुताळ, दत्तात्रय नाथा नरळे, अतुल ज्ञानेश्वर मेंगे आणि प्रशांत दत्तात्रय पवार यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

 

शुक्रवार (दि.६) मार्च २००९ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये अमोल रघुनाथ कुचेकर (वय.२६ रा.वारजे माळवाडी, पुणे) याचा मृत्यू झाला होता. यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीत अमोल याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर परिमंडळ १ चे तत्कालीन पोलीस उपायुक्त रघुनाथ खैरे यांनी मध्यस्थी करत, कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मुख्य रस्ता आणि पोलीस स्टेशन परिसरात काही संघटनांनी आंदोलन आणि दगडफेक देखील केली होती. यात काही नागरिक जखमी देखील झाले होते. त्यामुळे वारजे मधील वातावरण तणावपूर्ण झाले होते. तर जवळपास १ हजार अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त वारजे आणि ससून रुग्णालयात तैनात करण्यात आला होता.

 

त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणात लक्ष घालत, तत्कालीन गुन्हे शाखेच्या (DB) पथकावर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्याची पत्नी माधवी अमोल कुचेकर यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी तब्बल ९ वर्षांनी या घटनेचा निकाल लागला असून, बचाव पक्षाच्या वतीने अॅड. सुधीर शहा आणि अॅड. जितेंद्र सावंत यांच्या वतीने बचावामध्ये सहाही आरोपी पोलिसांचा अमोल कुचेकर याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात कोणताही समावेश नसल्याचा दावा करण्यात आला.

 

मयत अमोल हा चोरी करून पळून जात असताना, नागरिकांनी त्याला पकडून मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तत्काळ डॉक्टरांना पाचारण करून, उपचार करण्यात आले होते. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात देखील हलवण्यात आले होते. मात्र त्याचा त्यानंतर अचानक मृत्यू झाला होता. त्यामुळे अमोलच्या मृत्यूशी पोलिसांचा कोणताही संबंध नसून, त्यांनी खून केला नसल्याचा युक्तिवाद यावेळी करण्यात आला. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून, सहाही जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

 

 

81   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 32,   Business Category: NA   Similar News ID: 1000000069