भाजपा नगरसेविकेच्या घरी चोरी; सोनारासह मोलकरीण गजाआड
Wednesday, May 16 2018 6:25PM    CHECKMATE TIMES
Tags: thief maid, gold theft by maid, house worker women, corportaors house, sinhgad road police 1000006708

मोलकरीण रेकॉर्डवरील गुन्हेगार

आतापर्यंत १५ गुन्हे दाखल

यापूर्वी भोगली आहे २ वर्षांची शिक्षा

 

पुणे, दि.१६ (चेकमेट टाईम्स): कोणाच्याही हाताची सर्व बोटे एकसारखी नसतात, त्याचप्रमाणे घरातील काम करणारे सर्वच प्रामाणिक असत नाहीत, याची अनुभूती नुकतीच पुणे शहरातील भाजपा नगरसेविकेला आली. घरकाम करणाऱ्या मोलकरणीनेच घरातून चक्क ९ तोळे सोने लंपास केल्याच्या घटनेला या नगरसेविकेला सामोरे जावे लागले आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर मोलकरीण आणि चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनाराला गजाआड करण्यात आले आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हर्षा सुरेश शितोळे (वय ५३रा. हिंगणे खुर्द, पुणे) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून, देवराय गणपती रेवनकर (वय ६५, रा. शनिवार पेठ, पुणे) असे चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सोनाराचे नाव आहे. भाजपा नगरसेविका ज्योती किशोर गोसावी यांच्या घरी शितोळे हिने चोरी केली होती. तर कामाक्षी जेम्स आणि ज्वेलर्सच्या रेवणकर याने ते सोने विकत घेतले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील हिंगणे येथे राहणाऱ्या प्रभाग क्रमांक ३४ च्या भाजपा नगरसेविका ज्योती किशोर गोसावी यांच्या पार्थ बंगल्यामध्ये सोमवार (दि.७) मे रोजी चोरी झाल्याचे समोर आले होते. घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत एका महिलेने गोसावी यांच्या घरात घुसून ९ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्याच्या तपासामध्ये सिंहगड रस्ता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करताना, एक संशयित महिला आढळून आली. तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने आरोपी महिलेची ओळख पटवणे अवघड होते. मात्र, पोलिसांना मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेला अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान सोने चोरल्याचे महिलेने कबूल केले. तर ज्या सोनाराला ते विकले, त्याचे नाव आणि पत्ता देखील समोर आला. यानंतर त्या सोनाराला देखील अटक करण्यात आली.

 

दरम्यान सदरील महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. शहरातील विविध पोलीस स्टेशन मध्ये तिच्यावर तब्बल १५ गुन्हे दाखल असून, यापूर्वी एका गुन्ह्यात तिने दोन वर्षांची शिक्षा देखील भोगली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

 

परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे, सह पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरिक्षक विष्णू जगताप, पोलीस कर्मचारी यशवंत ओंबासे, संतोष सावंत, सुनिल पवार, दत्ता सोनावणे, राहूल शेडगे, श्रीकांत दगडे, दयानंद तेलंगे पाटील, मयुर शिंदे, सचिन माळवे, निलेश कुलथे, वामन जाधव यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

 

18   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 34,   Business Category: NA   Similar News ID: 1000000128