हवेली तालुक्यात भाजपा रुजवणारे दिवाकर पारखी कालवश
Saturday, Aug 11 2018 7:26PM    CHECKMATE TIMES
Tags: diwakar parkhi, death, bjp pune, haveli bjp, sad demise 1000006797

पुणे, दि.१० (चेकमेट टाईम्स): ८० च्या दशकापासून पुणे जिल्ह्यात आणि त्यातही हवेली तालुक्यात भाजपाचे नाव रुजवण्यात आणि आजच्या भाजपाच्या वाटचालीत मोठा वाटा असलेल्या वारजे मधील दिवाकर नारायण पारखी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई लक्ष्मीबाई, मुलगा जयदीप, मुलगी, जावई आणि नातू असा परिवार आहे.

 

पुणे जिल्ह्याच्या, शिरूर तालुक्यात असलेल्या उरळगाव या छोट्याश्या खेड्यात १७ जुलै १९४७ ला जन्म झालेल्या दिवाकर पारखी यांनी १९६२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत, जनसेवेचे व्रत घेत असताना, कुशाग्र बुद्धिमत्ता, लढाऊ वृत्ती, अमोघ वक्तृत्व, उत्तम लेखन कौशल्य असे अनेक गुण अंगी बाळगत, पत्रकारिता क्षेत्रासह, पारदर्शक राजकरणात देखील आपला अमिट असा ठसा उमटवला होता. काळाच्या ओघात राजकारणाला रामराम करत, फक्त समाजसेवा व्रतस्थ झालेले पारखी काका सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवत, श्रीराम शीला पुजनापासून, ते आता अखेरपर्यंत कार्यरत होते. त्यामुळे भाजपाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आतापर्यंत पारखी काकांचे सल्ले घ्यायला शेवटच्या श्वासापर्यंत आवर्जून येत होते. त्यांचा मुलगा जयदीप देखील आजही भाजपाचे काम करत असून युवा मोर्चाचा कोषाध्यक्ष म्हणून तो जबाबदारी सांभाळत आहे.

 

दिवाकर पारखी यांच्या वाटचालीचा ठळक आढावा घ्यायचा म्हटल्यास, जेव्हा दवाखाने आणि हॉस्पीटल्सचा थांगपत्ता नव्हता, त्या काळात अष्टांग आयुर्वेदाच्या सहकार्यातून वारजे या तेव्हाच्या दुर्गम भागात अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन पारखी हे करत होते. लक्ष्मी नारायण प्रतिष्ठानची स्थापना करत, गरीब आणि हुशार मुलांसाठी आज वारजे माळवाडी मधील नामांकित शाळा असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक विद्या मंदिर (मॉडर्न शाळा, पॉप्युलर नगर, वारजे) स्थापना करत, वारजेतील मुलांच्या शिक्षणाला एक नवा आयाम मिळवून दिला, तो दिवाकर पारखी यांनीच.

 

त्याचवेळी वारजे मध्ये उभ्या असलेल्या झोपडपट्टी मधील गुन्हेगारी कमी होऊन, सर्व रहिवाश्यांना संस्कार मिळावेत, यासाठी पावले उचलत, त्या झोपडपट्टीला राम नगर असे नाव देत संस्कार रुजवण्याचे पारखी यांनी धाडसी प्रयत्न केले, ते यशस्वी देखील झाले होते. त्याचबरोबर गरीब, गरजू, कामगार वर्गाची आर्थिक अडचण लक्षात घेत, १९८९ साली श्रीराम अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीची स्थापना करण्यात दिवाकर पारखी यांचा मोठा वाटा होता. दरम्यान ते वारजे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून देखील आले होते.

 

दलित आणि दुर्बल घटकांसाठी काम करता यावे म्हणून वारजे मध्ये दलित विकास संघाची स्थापना देखील दिवाकर पारखी यांनीच केली होती. पुढे कै.संभाजीराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना, हवेली तालुका अध्यक्षपदाची धुरा सांभाळत, हवेली तालुक्यात भाजपाला रुजवण्याचे काम खऱ्या अर्थाने कोणी केले असेल, तर ते दिवाकर पारखी यांनी केले असल्याचे भाजपाचे सर्व जुने जाणते पदाधिकारी कार्यकर्ते आजही सांगतात. त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीस भाजपाचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, राजकीय, कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

 


0   
0
प्रतिक्रिया
1000001761 Prasanna nagarkar   from  Pune     Aug 11 2018 10:33PM
थोर राजकारणी विचारवंत त्यापेक्षा जास्त जबाबदार प्रेमळ व्यक्ती त्यांच्या जाण्याने प्परिवराची झालेली पोकळी कोणीही कधीही भरून काढू शकणार नाही  
  0     0
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 31,   Business Category: NA   Similar News ID: 1000000091