कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला; प्राथमिक दर्शनी तब्बल ९५ कोटींना चुना
Tuesday, Aug 14 2018 10:20AM    CHECKMATE TIMES
Tags: cosmos bank, cyber attck, fraud, robbery, cash fraud, chaturshrungi police 1000006798

पुणे, दि.१४ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच (सर्व्हर) वर तीन दिवसांत दोनदा सायबर हल्ला करत, अज्ञात हॅकरने कॉसमॉस बँकेचे जवळपास ९४ कोटी ४२ लाख रुपये विदेशात हस्तांतरीत करत चुना लावल्याचे समोर आले आहे. सदरील सायबर हल्ला शनिवार (दि.११) दुपारी दुपारी ३ ते रात्री १० आणि सोमवार (दि.१३) सकाळी ११.३० वाजता असा दोन वेळा झाल्याचे कॉसमॉस बँकेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

 

याबाबत अज्ञात इसम आणि ए.एल.एम ट्रेडिंग कंपनी यांच्याविरोधात चतुर्श्रुंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुहास सुभाष गोखले (वय ५३, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांनी सदरील गुन्हा दाखल करून घेतला असून, चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे तपास करत आहेत.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉसमॉस बँकेचे गणेशखिंड रस्त्यावर कॉसमॉस टॉवर येथे मुख्यालय आहे. तेथे असलेल्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर शनिवार (दि.११) दुपारी दुपारी ३ ते रात्री १० दरम्यान कोणीतरी अज्ञात मालवेअरचा हल्ला करुन बँकेच्या काही व्हिसा व रुपे डेबीट कार्डधारकांची माहिती चोरुन त्याद्वारे व्हिसाचे अंदाजे १२ हजार व्यवहार करुन ७८ कोटी रुपये भारताबाहेर हस्तांतरित केले आहेत. तसेच २ हजार ८४९ व्यवहाराद्वारे २ कोटी ५० लाख रुपयांचे व्यवहार भारतात करण्यात आले आहेत, असे एकूण ८० कोटी ५० लाख रुपयांचे, १४ हजार ८४९ व्यवहार व्हिसा व एनपीसीआय यांनी पाठविलेल्या व्यवहार विनंतीला कॉसमॉस बँकेने मान्यता दिल्याचे भासवत, कोणी तरी अज्ञात व्यक्तीनेच रकमा काढून घेतल्याचे पुढे आले आहे.

 

तर सोमवार (दि.१३) सकाळी ११.३० वाजता पुन्हा हॅकरने स्विफ्ट ट्रान्झॅक्शन एनिशीएट करून, हाँगकॉंग येथील हॅनसेंग बँकेच्या ए़एलएम ट्रेडिंग लिमिटेड यांच्या बँक खात्यावर १३ कोटी ९२ लाख रुपये जमा करुन ते काढून घेतले. अशा प्रकारे हॅकरने तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा कॉसमॉस बँकेला चुना लावला असून, या सर्व प्रकारामुळे पुण्यातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली तर नवल.

 

शनिवार (दि.११) रोजी एकदा सलग ७ तासांचा हल्ला करून तब्बल ८० कोटी ५० लाखांना गंडा घालण्यात त्या अज्ञात हॅकरला यश आले होते. मात्र त्याने तेवढ्यावर समाधान न मानता पुन्हा एक दिवसाची रविवार सुट्टी वगळून सोमवार (दि.१३) रोजी सकाळी साडेअकरा वाजता हल्ला करत, १३ कोटी ९२ लाखांचा व्यवहार करणे, ही बाब विचार करायला लावणारी आहे. दोन्ही हल्ल्यांच्या मध्ये पूर्ण एक दिवसाचे अंतर असल्याचे यात समोर येते. त्यामुळे या हल्ल्यामागे नेमके काय आहे याचा उलगडा करण्याचे आव्हान पुणे शहर पोलिसांसमोर आहे.

 

 

9   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: 7,   Business Category: NA   Similar News ID: 1000000076