शहरात धार्मिक स्थळांवरील कारवाई तात्पुरती थांबवण्याचे आदेश
Thursday, Dec 20 2018 1:35PM    CTNN
Tags: pune city,dharmik sthal. 1000006940

पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्स): शहरात धार्मिक स्थळांवरील कारवाई तात्पुरती थांबवण्याचे आदेश गटनेत्यांच्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आले. ही कारवाई करताना फक्त धार्मिक स्थळेच नव्हे तर रस्त्यांवरील अतिक्रमणेही काढण्याची आग्रही मागणी या वेळी गटनेत्यांनी केली.

 

धार्मिक स्थळांवर सुरू असलेल्या कारवाईचे सोमवारी मुख्य सभेत पडसाद उमटले होते. ही कारवाई थांबविण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. त्यासंदर्भात महापौरांनी बुधवारी पक्षनेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला आयुक्त सौरभ राव, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, मनसे गटनेते वसंत मोरे, शिवसेनेचे संजय भोसले, अश्‍विनी लांडगे, सुनिता वाडेकर, अतिक्रमण नियंत्रण विभागप्रमुख माधव जगताप आदी यावेळी उपस्थित होते. 

 

या बैठकीत गटनेत्यांनी शहरात सुरू असलेली धार्मिक स्थळांवरील कारवाई थांबविण्याची मागणी केली. त्यात प्रामुख्याने प्रशासनाने अनधिकृत धार्मिक स्थळांची अ, ब आणि क अशी वर्गवारी केली आहे. त्यामधील क वर्गात जी 546 धार्मिक स्थळे आहेत, ती वाहतुकीला अडथळा ठरणारी नाहीत. त्यामुळे क वर्गातील धार्मिक स्थळांचे स्थलांतर करणे शक्य आहे का हे तपासावे व शक्य होत असल्यास गृहखात्याकडे पाठवलेल्या माहितीत प्रतिज्ञापत्राद्वारे बदल करणे शक्य आहे का, या सगळ्यांची शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या असल्याचे महापौर आणि गटनेत्यांकडून सांगण्यात आले.

 

पाटील इस्टेट जळीतग्रस्तांना मदत 

 

पाटील इस्टेट येथील झोपडपट्टीला लागलेल्या आगीत ज्यांच्या झोपड्या पूर्णपणे जळाल्या आहेत, त्यांना 11 हजार रुपये तर अर्धवट जळालेल्यांना 6 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

 

यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अशा घटनांमध्ये मदत देण्याबाबत नियमावली नाही. त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी नियमावली तयार करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

 

               

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Religious,   Business Category: NA   Similar News ID: 1000000006