चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने एका तेरावर्षीय मुलीचा मृत्यू
Friday, Feb 1 2019 10:22AM    CTNN
Tags: pune,bavdhan,death,girl,injection,inaccurate injection daughters death 1000007315

पुणे,दि.२(चेकमेट टाईम्स): चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याने एका तेरावर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे आणि या प्रकरणात संबंधित डॉक्टरवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बावधन येथे घडली. प्रज्ञा अरुण बोरुडे (13, रा. बावधन, पुणे) असे मृत्यू पावलेल्या  मुलीचे नाव असून  डॉ. बबन जाधव (रा. रामकृष्ण क्लिनिक, सिद्धार्थनगर, बावधन, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. 

 

सहायक पोलिस निरीक्षक आनंद पगारे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24  सप्टेंबर 2017 रोजी प्रज्ञाला थंडी ताप आल्याने तिला बावधन येथील रामकृष्ण क्लिनिकमध्ये उपचारासाठी आणले होते . तपासणी केल्यानंतर डॉ. जाधव याने प्रज्ञाच्या उजव्या कमरेवर एक इंजेक्शन दिले आणि काही गोळ्या देऊन तिला घरी सोडले. थोड्याच वेळात  प्रज्ञाला इंजेक्शन दिलेल्या जागी आणि उजव्या मांडीवर, कमरेवर आणि पाठीवर काळे चट्टे व फोड आले. त्यामुळे तिला त्वरित उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही वेळेत प्रज्ञाची प्रकृती आणखी खालावली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला आहे. 

 

प्रज्ञा हिच्या मृत्यूला डॉ. जाधव हेच कारणीभूत असून, त्यांनी चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्याचा आरोप प्रज्ञाचे वडील अरुण बोरुडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देखील केली. पोलिसांनी बोरुडे यांचा जबाब आणि डॉ. जाधव याने केलेल्या उपचारांची कागदपत्रे ससून रुग्णालयाच्या सक्षम अधिकार्‍यांच्या समितीसमोर सादर केली. 

 

या समितीने दिलेल्या अहवालात, इंजेक्शन दिल्याच्या जागी, कमरेवर, मांडीवर आणि पाठीवर काळे चट्टे व फोड येणे, ही इंजेक्शन चुकीच्या पद्धतीने दिल्याची लक्षणे आहेत. इंजेक्शन दिलेल्या जागेवरून झालेल्या जंतू प्रादुर्भावामुळे प्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. यात डॉ. जाधव याने हलगर्जीपणा केला आहे, असे स्पष्ट नमूद केले आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर प्रज्ञा हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉ. जाधव विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एम. डी. वरुडे करीत आहेत.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000091