औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे
Friday, Feb 1 2019 11:02AM    CTNN
Tags: pune,pimpri chinchwad,crime,72 people murdered in the industry city 1000007316

पुणे,दि.1(चेकमेट टाईम्स): औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीचा आलेख हा वाढत चालला आहे. मागील 2018 या वर्षात 72 जणांचा खून करण्यात आला. तर 93 जणांवर खुनी हल्ले झाल्याचे समोर आले आहे. यातील 9 खून प्रकरणांचा अद्याप उलगडा झाला नाही. या वाढत्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी  पोलिसांना या चालू वर्षामध्ये कठोर पाऊले उचलावी लागणार आहेत.  पिंपरी-चिंचवडसाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील पाच पोलिस ठाण्यांचा नव्या आयुक्तालयात समावेश करण्यात आला आहे. सद्य:स्थितीला 15 पोलिस ठाणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सुरू आहेत.

 

परिमंडळ एकमध्ये येणार्‍या पिंपरी पोलिस ठाण्यात 2018 या वर्षात खुनाच्या 3 घटना घडल्या असून, तीनही घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तसेच, 14 जणांवर खुनी हल्ले झाल्याची नोंद पिंपरी पोलिसात आहे. पिंपरी भाटनगर येथील सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या प्रकरणामुळे पिंपरी पोलिस ठाणे चर्चेत आले होते. या गुन्ह्यातील आरोपींचा अजूनही शोध सुरू आहे. भोसरी पोलिस ठाण्यात 5 खून तर, 8 खुनी हल्ले झाल्याची नोंद आहे. भोसरी पोलिसांनी तीनही प्रकरणांचा उलगडा केला आहे. निगडी पोलिस ठाणे हद्दीत 7 खून आणि 4 खुनी हल्ल्याची नोंद आहे. यातील सातही खून प्रकरणे उघडकीस आली आहेत. संभाजीनगर येथे प्रेम प्रकरणातून दहावीत शिकणार्‍या मुलाची हत्या झाली. तसेच, सलमान आणि मॅक्सचे हत्याकांड शहारात गाजले. चिंचवडमध्ये वर्षात 1 खून, 7 खुनी हल्ले अशी नोंद आहे. टोळीयुद्धात आकाश लांडगे या तरुणाचा खून हा चर्चेचा विषय ठरला. या प्रकरणातील रणजित चव्हाण या आरोपीला तीन महिन्यांनंतर जेरबंद करण्यात आले. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात 2 खून आणि 2 खुनी हल्ल्यांच्या घटना घडल्या. दोन्ही प्रकरणाचा उलगडा झाला. दिघीमध्ये 5 खून आणि 2 खुनाचे प्रयत्न करण्यात आले. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात नव्याने समावेश झालेल्या चाकण पोलिस ठाण्यात 15 खून प्रकरणांची नोंद आहे. त्यातील 9 खून उघड झाले असून, 6 प्रकरणामध्ये पोलिसांना काहीच धागेदोरे सापडले नाहीत. तसेच चाकणमध्ये 12 जणांवर खुनी हल्ला करण्यात आला आहे. आळंदी येथे 1 खून आणि 5 खुनाचे प्रयत्न दाखल आहेत. आळंदी येथील बालाजी कांबळे खून प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.  परिमंडळ दोनमध्ये येणार्‍या हिंजवडी पोलिस ठाण्यात 7 खून आणि 4 खुनी हल्ल्याची नोंद आहे. यातील 6 प्रकरणांचा उलगडा झाला असून, त्यातील एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू आहे. पतीच्या अनैतिक संबंधाला अडथळा ठरणार्‍या मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे शहरभर खळबळ उडाली. तसेच, कासारसाई येथील ऊसतोड कामगारांच्या मुलींवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. 

सांगवी पोलिस ठाण्यात 3 खून आणि 8 खुनांचे प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. यातील तीनही खून प्रकरणे उघडकीस आली आहेत. वाकड पोलिस ठाण्यात 6 खून आणि 4 खुनांचे प्रयत्न दाखल आहे. यातील रहाटणी परिसरात झालेले दोन खून प्रकरणातील आरोपींचा अद्याप सुगावा लागला नाही. देहूरोड पोलिस ठाण्यात 7 खून आणि 11 खुनांचे प्रयत्न दाखल आहेत. त्यातील सर्व गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात 3 खून आणि 9 खुनांचे प्रयत्न नोंद आहेत. तळेगाव दाभाडे पोलिसांनीदेखील सर्व गुन्हे उघडकीस आणले आहेत.  तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात 7 खून आणि 3 खुनांचे प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातील सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. चिखली पोलिस ठाण्याची नव्याने निर्मिती करण्यात आली असल्याने अद्याप चिखली पोलिस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा एकही गुन्हा दाखल नाही. शहरात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे शहराचे स्वास्थ्य बिघडले आहे. अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. पालकांचे मुलांवरील दुर्लक्ष याबाबत धोकादायक ठरत आहे.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004