पुणे, दि. २८
(चेकमेट टाईम्स): न्यु कोपरे गावच्या पुनर्वसन प्रक्रियेतून वंचित राहिलेल्या
कुटूंबांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज सोमवार दि. २८ जून
२०२१ रोजी युवक क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
करण्यात आली. 'हक्काच्या घरांसाठी सत्याग्रह' असे या आंदोलनाचे नाव होते.
न्यु कोपरे
गावातील ८८ वंचित कुटूंबांचे पुनर्वसन २००१ सालापासून झालेले नाही. २०१६ साली ह्या
वंचित कुटूंबांनी युवक क्रांती दलाकडे यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती केली
होती. त्यावेळी विकसक संजय काकडे यांनी युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.
कुमार सप्तर्षी यांना भेटून पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काकडे
यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यानंतर 17 एप्रिल २०१७ पासून एप्रिल २०१८ पर्यंत
युवक क्रांती दलाने रस्त्यावर उतरून सत्याग्रही आंदोलने केली. ६ एप्रिल २०१८ रोजी
तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात
बैठक झाली. या बैठकीस डॉ. सप्तर्षी, युक्रांदचे पदाधिकारी आणि
विकसक सुर्यकांत काकडे हजर होते. या बैठकीत काकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या
मार्गदर्शनाखाली पुनर्वसन करू, असे आश्वासन दिले होते.
जिल्हाधिकारी
कार्यालयाकडे ८८ वंचित कुटूंबांची पुरावे असलेली कागदपत्रे युवक क्रांती दलाने
सादर केली. या कागदपत्रांची छाननी करून जानेवारी २०२० मध्ये जिल्हाधिकारी नवल
किशोर राम यांनी वंचित कुटूंबांचा अधिकार मान्य केला आणि विकसक काकडे यांना नोटीस
बजावली. जानेवारी २०२० पासून आजपर्यंत वंचित कुटूंबांची पुनर्वसन प्रक्रीया सुरू
झालेली नाही. या अन्यायाबदद्ल विकसक काकडे यांच्यावरही कोणतीही कारवाई झालेली
नाही. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी सोमवार २१ जुन रोजी कर्वेनगर, पुणे
येथील न्यु कोपरे गावठाण पुनर्वसन प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर सत्याग्रही आंदोलन
करण्यात आले होते, त्यानंतर आज पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
करण्यात आली. वंचित ८८ कुटूंबांची पुनर्वसन प्रक्रीया सुरू करावी, अशी या आंदोलनाची मागणी आहे.
संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, अप्पा अनारसे, सचिन पांडूळे, कमलाकर शेटे, सुदर्शन चखाले, यल्लाप्पा धोत्रे, नंदू शेळके, ललित मुथा, कुमार गायकवाड आणि पुनर्वसनापासून वंचित नागरीक आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप
करा ! आम्हाला फेसबुक आणि युट्युबवर फॉलो करा
फेसबुक
लिंक :
युट्युब
लिंक :
इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/