पुणे, दि. २९
(चेकमेट टाईम्स): पुण्यातील वारजे कर्वेनगर प्रभाग ३१ मधील डीपी रोडला स्वराज्य
रक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल आणि एपीजे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलच्या
परिसरात पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पदपथ आणि पदापथाखाली स्ट्रॉम वॉटर लाईन टाकण्यात येत आहे. मात्र सदरील काम निकृष्ठ
दर्जाचे आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने चालू असून, त्याकडे अधिकाऱ्यांचे
दुर्लक्ष्य असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सदोष कामामुळे भविष्यात
नागरिकांच्या जीविताला धोका उत्पन्न झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न
उपस्थित केलाय राष्ट्रवादीचे पदाधिकारी आनंद उर्फ बंडू तांबे यांनी.
या भागात
तब्बल १ हजार २०० मिलिमीटर व्यासाची स्ट्रॉम
वॉटर लाईन टाकण्यात येत असून, त्याचे चेंबर बांधताना पाईप मधून येणाऱ्या पाण्याला
अडथळा निर्माण करत, सदोष पद्धतीचे चेंबर बांधण्यात आलेले आहेत. सदरील काम एवढ्या
वेगाने केले जात आहे की, यातील दोष कोणाच्या लक्षात येणार नाहीत. मात्र सदरील
चेंबर बांधून काही दिवस होत नाहीत, तोवरच त्याला तडे गेले असून, काम घाईघाईत
उरकण्याच्या नादात, पदपथावर सिमेंट कॉंक्रीट टाकण्यात आलेले असून, लवकरच त्यावर ब्लॉक
बसवून पदपथ तयार करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न असल्याचे समोर येत असल्याचा आरोप
तांबे यांनी केला आहे.
या कामाचा दर्जा तपासाला जावा, चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, चुकीच्या पद्धतीने काम सुरु असताना
त्याकडे दुर्लक्ष्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशाप्रकारच्या
मागण्या आनंद तांबे यांनी केल्या आहेत. याबाबत पुणे महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता
कौशल सराफ यांना विचारणा केली असता, आपण पाहणी करून ठेकेदाराला योग्य त्या सूचना
देऊ, असे आश्वासन सराफ यांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना दिले आहे.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर
व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुक,
इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो
करा...!
फेसबुक लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
युट्युब लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes