पुणे, दि. 25
(चेकमेट टाईम्स): वारजे हायवे परिसर तसा सौंदर्याने नटलेला परिसर
असे त्या मार्गावरून मार्गक्रमण करणारे सर्वजण म्हणतात. मात्र गेल्या काही
महिन्यांपासून त्या सौंदर्याला बाधा आणण्याचे षडयंत्र तर चालू नाही ना असा प्रश्न
नागरिक उपस्थित करू लागले आहेत. तर याकडे स्थानिक नगरसेवकांसह महानगरपालिका
अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का? का त्यांचाच याला छुपा पाठींबा आहे असा प्रश्न उपस्थित
होऊ लागला आहे.
सद्यस्थितीला
पॉप्युलर नगर चौकातील म्हणा किंवा माई मंगेशकर रुग्णालयासमोरील उड्डाणपुलाखाली तशी
परिस्थिती होऊ लागली असून, हे असेच चालत राहिले तर पुढील काही महिन्यांमध्ये या
उड्डाणपुलाखालुन चालत जाणाऱ्यांना डबल ऐवजी टिबल मास्क लावावा लागेल आणि वाहन
चालकांना कधी एकदाचा इथून पुढे निघतोय अशी परिस्थिती उद्भवल्यास वावगे वाटायला
नको.
या
उड्डाणपुलाच्या एका बाजूला भारत गॅसच्या एजन्सीने जसे काही पुलाखालील ही जागा
भाडेतत्वावर घेतली आहे, असे सिलेंडरचे लोडिंग अनलोडींग, पार्किंग सर्रास चालू
असल्याचे पाहायला मिळते आहे. त्याचाच आडोसा घेऊन लहान लहान टेंपो मधून आणलेला
राडारोडा याच भागात टाकला जातोय. तर मद्यपींचा देखील येथे अड्डा भरत असल्याने
रुग्णालयात आलेल्या नातेवाईक मंडळींना याचा त्रास होऊ लागला आहे. तर दुसऱ्या
बाजूला कचऱ्याचे डम्पिंग स्टेशन चालू झाले आहे. या भागात कचऱ्याच्या गाडीत कचरा
चढवणे, उतरवणे, त्याचे विलगीकरण करून बाजारीकरण करणे असे उद्योग चालू असल्याचे
पाहायला मिळते.
त्यामुळे मधला वाहतुकीला वापरला जाणारा भाग वगळता उरलेले दोन्ही भाग वारजे हायवेचे सौंदर्य बाधित करण्यासाठी पालिकेने उपलब्ध करून दिले आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. तर या भागात गार्डनिंग करण्यासाठी माती आणून टाकली पण त्यात झाडे का लावली गेली नाहीत असा प्रश्न नागरिक उपस्थित करत असून, कागदोपत्री झाडे लावूनही झाली नाहीत ना असाही प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे. एकूणच वारजेचे वाटोळे होऊ नये अशी अपेक्षा नागरिक करत असून, चुकीच्या कामांना वेळीच चाप लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
#WarjeHighway #MaiMangeshkarHospital #PopularNagarJunction #ShaniMarutiMandirWarje #WarjeFlyover #BeautificationOfWarje #WarjeMalwadi #Pune #PuneCorporation