Type Here to Get Search Results !

आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात सरकारला धारेवर धरू; चंद्रकांत पाटील यांची ग्वाही


मुंबई, दि. १८ (चेकमेट टाईम्स): आशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकूनही घेतल्या नाहीत, याचा आपण निषेध करतो. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात भारतीय जनता पार्टी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरेल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
 
ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, समाजाच्या कोणत्याही घटकाने अन्यायाच्या विरोधात बोलता कामा नये, असे या सरकारचे धोरण आहे. कोणीही आंदोलन केले की लगेच गुन्हे दाखल करायचे, लाठीचार्ज करायचा असे चालू आहे. ज्या आशा कर्मचाऱ्यांनी जिवावर उदार होऊन गेली दीड वर्षे कोरोनाच्या साथीत काम केले त्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांनी गाडीत बसून ऐकून तरी घ्यायला हव्या होत्या. पण ‘हम करे सो कायदा’, असे चालू आहे, याचा आपण निषेध करतो. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या प्रश्नावर भाजपा सरकारला धारेवर धरेल.
 
ते म्हणाले की, आपले राज्य आहे म्हणून शिवसेना कार्यकर्ते राडे करतील तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात त्यांचे सरकार असल्याने शांतता राखण्याची जबाबदारी शिवसेनेची असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली आहे. आता हा विषय संपायला हवा असे आम्हालाही वाटते. तरीही शिवसैनिकांना असाच संघर्ष चालू ठेवायचा असेल तर भाजपाचे कार्यकर्ते सक्षम आहेत.
 
त्यांनी सांगितले की, महानगरपालिकांची वॉर्ड रचना करताना शहराच्या विकासाचा विचार करायला हवा. राज्य सरकारने कोणतीही रचना आगामी निवडणुकीत आणली तरी भारतीय जनता पार्टीला फरक पडत नाही. भाजपाची संघटनात्मक रचना बळकट आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.