पुणे, दि. २६
(चेकमेट टाईम्स): “कांचा” नेपाळी रखवालदार म्हणजे विश्वासाचे दुसरे नाव. हा कांचा
आपल्या घरावर, परिसरावर कोणतेही संकट येऊन देणार नाही, अशी ख्याती सर्वदूर पसरलेली
आहे. मात्र वर्षानुवर्षे नेपाळी रखवालदारांनी जमवलेली ही विश्वासाची पुंजी काही
बोटावर मोजण्याएवढ्या नेपाळी मंडळीनी धुळीस मिळवली आहे. पुण्यात एक कट करून
सोनाराचे दुकान फोडून चोरीची अनोखी शक्कल लढवलेल्या नेपाळी चोरट्यांना पिंपरी
चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखाच्या युनिट ४ ने कोणतेही पुरावे मागे नसताना मोठ्या
शिताफीने अटक केली आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील बावधन मध्ये असलेल्या गीतांजली अपार्टमेंट मधील जगदंबा ज्वेलर्स या दुकानाच्या बाजूचे दुकान 15
जून 2019 रोजी काही इसमांनी चायनीजचा व्यवसाय करण्यासाठी भाड्याने घेतले होते. तर
18 जून 2019 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी जगदंबा ज्वेलर्सच्या मालकाने दुकान उघडले
असता, त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. यावेळी चोरट्यांनी शेजारील
चायनीजच्या दुकानातून पोट माळ्यावरील भिंतीला भगदाड पाडून, जगदंबा ज्वेलर्स मध्ये
प्रवेश करून, गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसत होते. मात्र
तिजोरी न फुटल्याने दुकानातील वर ठेवलेले चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि
संपूर्ण घटना चित्रित झालेला सीसीटीव्हीचा मुख्य पुरावा ‘डीव्हीआर’ असा एकूण 3 लाख
55 हजार रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी चोरून नेला होता.
सदरील
गुन्हा गंभीर स्वरूपाचा आणि तो करण्याची पद्धत वेगळी असल्याने, पिंपरी चिंचवडचे
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सदर गुन्हा हा पुढील तपास कामी गुन्हे शाखा युनिट ४
कडे वर्ग करून, या गुन्ह्यात स्वतः लक्ष घालून गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेश दिले
होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृत देशमुख, सिद्धनाथ बाबर आणि
कर्मचाऱ्यांनी सदर गुन्ह्याचा कसोशीने तपास सुरू करून, घटनास्थळाचा आजूबाजूच्या
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी व इतर तांत्रिक विश्लेषण सुरू केले.
तसेच
सदर गुन्ह्यात स्थानिक परिसरात काम करणारे नेपाळी रखवालदार सामील असण्याची दाट
शक्यता असल्याने, आजूबाजूच्या परिसरात राहणारे सर्व नेपाळी रखवालदाराची माहिती
काढण्यास सुरुवात केली. दरम्यान हिंजवडीच्या मारुंजी परिसरातील एक रखवालदार सदर
गुन्ह्यात सामील असल्याचा संशय आल्याने, त्याचा शोध घेतला असता, तो सदरील घटना
झाल्यापासून काम सोडून गेल्याचे समजले. त्याच्यामुळे त्याच्यावरील संशय बळावला.
दरम्यान
पोलिस त्या नेपाळी रखवालदाराचा शोध घेत असताना तो ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ भागात
वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी
अंबरनाथ येथे जाऊन 12 जुलै 2019 रोजी सदरील रखवालदार जगत बम शाही (वय 28 रा.
क्रिस्टल पॅलेस, कृष्णा कॉलनी, मारुंजी, मूळ गाव- गैटाडा, विनायक नगरपालिका,
जिल्हा अच्छम, नेपाळ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करून, त्याचे साथीदार
गणेश विष्णू शाही (वय.30 गाव भरुआ, लमकी टिकापुर रोड, जिल्हा कैलासी, नेपाळ)
खगेन्द्र दोधी कामी (वय. २७ मूळ गाव घाटगाऊ, चौगुने गाव पालिका, जिल्हा सुरखेत,
नेपाळ) प्रेम रामसिंग टमाटा (वय 42 सध्या राहणार पद्मालय पार्क, लंडन ब्रिज जवळ,
पुनावळे, मूळ कालेकांडा, विनायक नगरपालिका, अच्छम, नेपाळ) यांना ठाणे शहरातून
वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेऊन, त्यांच्याकडे सदर गुन्हा उघडकीस आणला.
सदर
आरोपींकडे केलेल्या तपासात, त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार शंकर चंद्र उर्फ
कांचा लामा, अर्जुन उर्फ ओम रावल, शंकर चंद्र उर्फ कांचा लामा (सर्वजण रा. धनगढी,
नेपाळ) आणि त्यांचे झारखंड येथून बोलावलेले ३ साथीदार यांच्यासह ईनोवा गाडी चालक
रईस कादर खान (वय 52, गोरेगाव पश्चिम मुंबई) याच्यासह केल्याचे निष्पन्न झाले.
त्यांच्याकडून आत्तापर्यंत १२ लाख 3 हजार 940 रुपये किमतीचा मुद्देमाल, ज्यात १
किलो 719 ग्रॅम चांदीचे आणि ११ ग्रॅम सोन्याचे दागिने. तसेच चोरी करताना वापरलेली
इनोवा कार, एक मोटारसायकल, मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
सदर
प्रकरणात अटक आरोपी गणेश शाही व फरार असलेले शंकर उर्फ कांसा लामा हे मुख्य
सूत्रधार असून, त्यांनी चोरी करण्याकरता सोनाराचे शेजारील दुकान भाड्याने घेता
येईल, अशा बऱ्याच ठिकाणांची पाहणी करून सांगवी पोलीस स्टेशन हद्दीतील एक व बावधन
येथील एका सोनाराचे दुकान बघून ठेवले होते. त्यानंतर बावधन येथील जगदंबा ज्वेलर्स
या दुकानाचे शेजारील बंद असलेले दुकान भाड्याने मिळाल्याने 15 जून 2019 रोजी दुकान
ताब्यात घेऊन, त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून घेऊन 17 जून 2019 चे रात्रीतून
सदरील चोरीचा डाव साधला होता.
तर
सदर जगदंबा ज्वेलर्सच्या चोरीचे प्रकरण शांत झाल्यावर, काही दिवसांनी परत येऊन
सांगवी परिसरातील पाहून ठेवलेल्या त्या दुसऱ्या दुकानात याच प्रकारे चोरी करण्याचा
त्यांचा विचार होता. तसेच आरोपींकडे केलेल्या तपासात गणेश शाही व शंकर चंद्र लांबा
या दोघांनी त्यांचे इतर साथीदारांनी 30 मे 2019 रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे
स्थानिक रखवालदाराच्या मदतीने एका बँकेचे शटर कापून चोरी केल्याचे उघड झाले असून
त्याबाबत मुरबाड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर
आरोपींची ही एक मोठी टोळी असून, अटक आरोपी गणेश विष्णू शाही आणि फरार आरोपी शंकर
चंद्र उर्फ कांचा लामा हे दोघे मुख्य आरोपी
असून, त्यांनी यापूर्वी याच पद्धतीने अनेक गुन्हे केले आहेत. गणेश शाही याच्यावर
घरफोडी व दरोड्याच्या प्रयत्नाचे एकूण 12 गुन्हे, प्रेम टमाटा याच्याविरुद्ध ४
गुन्हे दाखल असून, आरोपी शंकरचंद्र लामा उर्फ कांचा याच्यावर एकूण ५ गुन्हे दाखल
आहेत. तसेच सदर आरोपी हे अत्यंत धूर्त आणि चलाख असून ते नेहमी फेसबुक मेसेंजरचा
वापर करून एकमेकांना ऑडीओ व व्हिडीओ कॉल करतात.
सदरची
कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ
पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत
अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृत देशमुख, सिद्धनाथ बाबर, सहाय्यक पोलीस
उपनिरीक्षक धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव, पोलिस हवालदार प्रवीण धुळे,
संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, रोहिदास आडे, संतोष असवले, तुषार शेटे, पोलीस नाईक
लक्ष्मण आढारी, गौस नदाफ, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, सुरेश जायभाय, पोलीस शिपाई
प्रशांत सईद, तुषार काळे, आजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद
चव्हाण आणि तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय
तुंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, विकास
आवटे, पोपट हुलगे यांनी केली आहे.
माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/