Type Here to Get Search Results !

जून महिना संपला, मात्र दरवर्षी प्रमाणे यंदाही वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत नाले सफाई नाहीच?

 

पुणे, दि. १ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नालेसफाई आणि पावसाळी वाहिन्यांच्या सफाईच्या उलट-सुलट चर्चा दरवर्षी होतात, तशा यंदा देखील सुरु आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने काही नगरसेवकांनी आपल्या भागातील नालेसफाई चालू असल्याची ठेकेदाराकडून आलेली छायाचित्रे स्वत:च्या सोशल मिडीयावर शेअर केली. मात्र प्रत्यक्षात दरवर्षीप्रमाणेच फक्त नागरिकांच्या दृष्टीला सहज पडणाऱ्या ठिकाणांची सफाई आणि इतरत्र बोंब अशीच अवस्था असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे फक्त कागदावर नालेसफाई आणि पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता झालेली असून, प्रत्यक्षात काही लोकांची असलेली मिलीभगत सर्वसामान्य जनतेला मात्र वेठीस धरत आहे.

दरवर्षी वारजे मधील अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचा फुगवटा तयार होऊन पाणी रस्त्यावर आलेले दिसते. मात्र त्याच्या कारणांचा शोध कोणी घेतलेला नाही. किंबहुना त्या फुगवट्याशी संबंधित असलेल्यांनी आपल्या अमोघ वाणीने तो शोधच घेऊन दिला नाही. मात्र चेकमेट टाईम्सने त्याचा शोध घेतलेला असून, नाल्यांची आणि पावसाळी वाहिन्यांची काही अशी ठिकाणे आहेत. ज्याची वर्षानुवर्षे स्वच्छताच झालेली नाही. मात्र ते सिद्ध करणे अवघड असल्याचा गैरफायदा यंत्रणेतील मंडळी घेतात. त्याला कारणे देताना, खूप मोठा पाऊस झाला. गाळ वाहून आला, रस्त्याच्या कडेचा राडारोडा वाहून आला, अशी एक ना अनेक करणे देता येतात, नव्हे दिली जातात.

मात्र त्याचवेळी त्याचे उपप्रश्न विचारले गेले की, त्या प्रश्नांना आपल्या अमोघ वाणीने टाळण्यात यंत्रणेतील काहीजण चतुर असतात. एकूणच काय तर “तेरी भी चूप आणि मेरी भी चूप” चे निकष लावून मोठे गौडबंगाल सुरु आहे. यात नाहक सामान्य जनता भरडली जात असून, नागरिकांनीच या विरोधात उठाव न केल्यास, हे असेच सुरु राहणार यात तिळमात्र शंका नाही.

सद्यस्थितीला वारजे मधील नाल्यांची अवस्था तशीच असून, फक्त काही ठिकाणे वगळता सर्वत्र नाल्यांमध्ये अगोदरपासुनच साठलेला गाळ आणि राडारोडा साफ झालेला नाही. त्याची परिणीती मोठा पाऊस झाल्यावर समोर येईलच आणि तेव्हा ठरलेली कारणे दिली जातीलच. यावर उपाय म्हणजे नाला स्वच्छतेचे फोटो नव्हे तर पूर्ण व्हिडीओ ठेकेदारांकडून पालिकेने जमा करून घेणे गरजेचे असून, थर्ड पार्टी सारखी खोट्या तपासणी यंत्रणांवर विश्वास ठेवण्यापेक्षा गुगल सारख्या यंत्रणांचा वापर केला जावा अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.

एकूणच काय तर आता तरी प्रत्यक्ष नाल्यांची आणि पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता होणार का फक्त कागदावरच स्वच्छता दिल्याचे दाखले दिले जाणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तशीच काही अवस्था जेटींग मशीन यंत्रणेची असून, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत गेल्या काही वर्षांमध्ये जेटींग मशीनचा प्रत्यक्ष वापर आणि ठेकेदाराला प्रत्यक्षात दिले जाणारे बिल यात तफावत असल्याचा आरोप सामाजिक संघटनांकडून होत आहे. याची महानगरपालिकेच्या सक्षम यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

फेसबुक लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

युट्युब लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.