पुणे :कोरोना साथीनंतरच्या काळात विविध करीयर संधींचा शोध घेऊन सक्षम होण्यासाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ (नॅशनल फेडरेशन फॉर ब्लाइंड, महाराष्ट्र) च्या वतीने नॅशनल फेडरेशन फॉर ब्लाइंड, इंडिया ' च्या सहकार्याने' आयोजित इन्स्पिरेशन 2022 ' या राष्ट्रीय युवती परिषदेचे उद्घाटन आळंदी येथे झाले. ' डेअर टू रिशेप द वर्ल्ड ' या संकल्पनेवर ही परिषद होत आहे. ४ आणि ५ जून रोजी आळंदीत धारिवाल सभागृह ( फ्रूटवाला धर्मशाळा , आळंदी देवाची)येथे ही परिषद होत असून विविध राज्यातून दृष्टिहीन युवती उपस्थित आहेत.
आळंदी येथे 4 जून रोजी जर्मनीतील सामाजिक समुपदेशक टिमोथस रुसेटी यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता युवती परिषदेचे उद्घाटन पार पडले . राष्ट्रीय दृष्टीहीन संघ ( भारत )च्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ कुसुमलता मलिक उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ ( महाराष्ट्र ) प्रदेश सचिव दत्तात्रय जाधव, प्रवक्त्या सकीना बेदी ,डी पी जाधव, एल.एच. खापेकर , सपना भोसले हेही उपस्थित होते.
टिमोथस रुसेटी म्हणाले, ' दृष्टीहीन व्यक्तीना दृष्टी नसते, पण, दुरदृष्टी असते. त्यांचे समाजातील स्थान महत्वाचे आहे. त्यांना रोजगार मिळवून देण्याबरोबर आयुष्यात उभे केले पाहिजे. शिक्षणातून सक्षम होऊन सकारात्मकता वाढवली पाहिजे. तंत्रशिक्षणातून , कौशल्य प्रशिक्षणातून दृष्टीहीन व्यक्तींना रोजगार मिळू शकतो, यासाठी जर्मनी मदत करेल.
एसएफयू कॅनडाच्या परराष्ट्र विभागाच्या उपाध्यक्ष सोभना जया माधवन यांचे बीजभाषण झाले.सोभना माधवन म्हणाल्या, ' दृष्टीहीन व्यक्तींना सहानुुभुती पेक्षाआपुलकी दाखविण्याची गरज आहे. या व्यक्तींच्या जीवनात परिवर्तन आणण्याची गरज आहे. सरकार, कंपन्या, संस्था या परिवर्तनासाठी काय करतात, हे पाहण्यापेक्षा आपण काय करू शकतो, हे पाहणे गरजेचे आहे.
डॉ.कुसुमलता मलिक म्हणाल्या, 'खासगी क्षेत्रात अजूनही दृष्टीहीन व्यक्तींना पुरेसे स्थान मिळत नाही. त्यासाठी कौशल्ये वाढवून संघटित होण्याची गरज आहे. समाजातील सर्व घटक सक्षम झाल्याशिवाय संपूर्ण समाज सक्षम होणार नाही. उद्घाटना नंतरच्या सत्रात त्रिदेव खंडेलवाल यांनी 'वित्त आणि सनदी लेखापाल ' क्षेत्रातील कारकीर्दीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले.
उद्योजकता विकासापुढील आव्हाने या विषयावरील परिसंवादात दानिश महाजन ( रेडिओ उडान ), संदीप मोरजकर (हॉटेलियर ), मेघना बेहेरे ( आयटी इंडस्ट्री ) यांनी मार्गदर्शन केले. डॉ शंतनु लडकत यांनी परिसंवादाचे संचालन केले. ' उच्च शिक्षणातील करिअर संधी ' या विषयावरील परिसंवादात टोनी कुरियन (आयआयटी मुंबई ), वैशाली दाबके (मॅक्सम्युलर भवन, पुणे ),रक्षित मलिक (संशोधक ) सहभागी झाले. दानिश महाजन यांनी संचालन केले. 'खेळ आणी मनोरंजन क्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी ' या कार्यशाळेत मिनीता पाटील ( माजी संचालक, बालकल्याण संस्था ) यांनी मार्गदर्शन केले. ' व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेतील कारकीर्दीच्या संधी ' या विषयावर नागराज मोरे,सदफ खान, प्रीतम सुंकवल्ली ,आरती ताकवणे यांनी मार्गदर्शन केले .आदिती शहा (अमेरिका ) यांची दृकश्राव्य मुलाखत झाली.
दोन दिवस मार्गदर्शन सत्रे
या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच जून रोजी नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे .त्यात डॉ कुसुमलता मलिक मार्गदर्शन करतील. ' माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील करियर संधी ' विषयावरील कार्यशाळेत श्रीनिवासु चक्रवरथुला मार्गदर्शन करतील. ' कार्पोरेट क्षेत्रातील वैविध्य आणि सहभाग ' या विषयावरील चर्चासत्रात नीरज कुमार, रजनी विनोद , डॉ.सोनम कापसे, सोभना जय माधवन सहभागी होतील. 'कायदेशीर हक्क ' विषयावरील परिसंवादात डॉ.संजय जैन ,ऍड .जयना कोठारी, अंचल भतेजा, डॉ. जया सागडे सहभागी होतील. डॉ जया सागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण परिषदेचा समारोप होईल.