दि.२२ जून २०२२
(चेकमेट टाईम्स): मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट
असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर
सहभागी होणार आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं
नवं पर्व सुरू झालं. पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष
पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर दुसऱ्या आठवड्यात ज्येष्ठ लेखिका आणि
समाजसेविका पद्मश्री सुधा मूर्ती उपस्थित होत्या. 'कोण होणार
करोडपती'च्या आगामी भागात मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना 'अशोक मामा' म्हणून ओळखते असं
अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ उपस्थित राहणार आहेत.
त्यांना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. अशोक
मामांनी वयाची पंच्याहत्तरी नुकतीच पूर्ण केली असली, तरी त्यांचा या
वयातला उत्साह दांडगा आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ
आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेही सहभागी होणार
आहेत.
यशाचं शिखर गाठूनही पाय कायम जमिनीवर असणाऱ्या अशोक मामांनी विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकासुद्धा चोख बजावल्या आहेत आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. सिनेसृष्टीतल्या त्यांच्या कारकिर्दीमधल्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अभिनयातल्या अशा तळपणाऱ्या सूर्याच्या येण्यानी 'कोण होणार करोडपती'चा मंच उजळून निघणार आहे.'कोण होणार करोडपती'च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पंढरपूरजवळील एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्या आणि त्यांना आधार देणार्या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित 'पालवी' या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत.
अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर 'अशी ही बनवाबनवी', 'धुमधडाका', 'नवरा माझा नवसाचा' असे अनेक हीट
चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यांचा 'ययाती'पासून सुरू झालेला नाट्यसृष्टीतला प्रवास आत्ताच्या 'व्हॅक्युम क्लिनर'पर्यंत
अव्याहतपणे सुरू आहे. अशोक मामांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ५० वर्षं पूर्ण
झाली आहेत.'कोण होणार करोडपती'च्या मंचावर
सिनेनाट्यसृष्टीतल्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. मनोरंजनसृष्टीत पदार्पण
करण्यापूर्वी अशोक मामा बँकेत नोकरी करायचे आणि एकीकडे नाटकाचे दौरे करायचे. त्या
वेळी खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन बँकेत घेतलेल्या सुट्ट्यांचे मजेदार किस्से मामा
आणि त्यांचे बंधू यांनी या वेळी सांगितले. लहानपणी प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील
गावस्कर यांच्याबरोबर नाटकात काम
केल्याच्या आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळल्याच्या आठवणीही मामांनी सांगितल्या.'ययाती आणि देवयानी' ह्या नाटकातून
त्यांनी रंगमंचावर पदार्पण केलं, 'प्रेमा तुझा रंग
कसा' या नाटकातला पँटची नाडी सुटल्याचा गमतीशीर किस्सा, 'भस्म' चित्रपटातल्या
भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, संगीताची आवड; अशा अनेक आठवणी आणि किस्से यांमुळे 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग अधिकच
रंगतदार होणार आहे.अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला आणि दिलदार
माणसाला 'कोण होणार
करोडपती'च्या मंचावर पाहणं, ही
प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद आणि आनंददायी गोष्ट असणार आहे.
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84