पुणे, १५ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): ज्या कंपनीने टेंडर
प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार करून टेंडर मिळवल्याचा ठपका कॉम्पिटिशन कमिशन ऑफ
इंडियाने ठेवला आणि 1.26 कोटी रुपयांचा दंड ठोठावला,
त्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्या ऐवजी पुणे
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वारंवार अनेक टेंडर त्या कंपनीला दिले आणि परिणामी
कोट्यावधी रुपयांचा भुर्दंड पुणेकर नागरिकांना सोसावा लागला आहे. एवढ्या मोठ्या
गैरव्यवहारामागे मोठा राजकीय वरदहस्त असल्याने हे सर्व राजरोसपणे सुरु आहे.
पुणे शहरातील मिळकतींची माहिती घेण्यासाठी
जीआयएस मॅपिंगसाठी नेमलेल्या सार आयटी रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने
केलेल्या चुकीच्या पद्धतीच्या कामामुळे पुणे शहरातील अनेक मिळकत धारकांची 40 टक्के
सवलत रद्द झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मिळकत कराची जादा रकमेची बिले आली आहेत, हे आता पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर
संकलन विभागाने मान्य केले आहे आणि कंपनीला दंड ठोठावला आहे अशी आज बातमी आहे. या
कंपनीवर राजकीय वरदहस्त असल्याने वारंवार पुणे महानगर पालिकेमार्फत मेहेरनजर
दाखवली जात आहे. पुणेकरांच्या मिळकतकराचा पैसा लुटण्यामागे राजकीय साटेलोटे
कारणीभूत आहे. या भ्रष्ट राजकारणाची शिक्षा पुणेकर जनतेला वाढीव मिळकत कर भरुन चुकवावी लागते आहे. या कंपनीच्या
टेंडरला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर, बिले तपासणाऱ्या कर संकलन विभागाच्या आणि कामगार कल्याण विभागाच्या
अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच या कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी
मागणी आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी
केली आहे.
या कंपनीने वेळोवेळी गैरप्रकार करून ही
पुणे महानगरपालिकेमध्ये अनेकदा टेंडर मिळवलेली आहेत... कंपनीने मिळालेले काम नीट
पूर्ण केलेले नाही तरीदेखील त्यांना त्यांचे पैसे देण्यात येतात... कोणी जास्त
आवाज उठवला, तक्रार केली तर टेंडरच्या
काही टक्के भाग दंड म्हणून आकारण्यात येतो आणि परत त्या कंपनीला नवीन टेंडर दिले
जाते. असे दुष्टचक्र पुणे मनपामध्ये अर्थपूर्ण राजकीय आशीर्वादाने राजरोस सुरु
आहे.
वर्ष 2015 मध्ये नागरिक चेतना मंच तर्फे
कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडे एक तक्रार दाखल करण्यात आली की पुणे
महानगरपालिकेच्या हद्दीतील झाडांच्या जिओ मॅपिंगचे टेंडरमध्ये संगनमताने
गैरव्यवहार केले आहेत. 9 कोटींचे हे टेंडर सार आयटी रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड
या कंपनीला मिळाले. सार आयटी ला हे टेंडर मिळावे म्हणून CADD आणि Pentacle
या कंपन्यांनी संगनमताने डमी बिडींग केले होते. त्याला
मनपातील काही लोकांचा आशिर्वाद होता. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने सुरू केलेल्या
चौकशीमध्ये हा गैरप्रकार स्पष्ट झाल्यामुळे सार आयटी रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड
या कंपनीवर 1 कोटी 26 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तसेच इतर दोन कंपन्यांवर आणि या तिन्ही
कंपन्यांच्या संचालकांवर देखील वेगळा दंड ठोठावण्यात आला. तरीही या कंपनीला पुणे
महानगरपालिकेने काळ्या यादीत टाकले नाही.
याच सार आयटी रिसोर्सेस प्रायव्हेट
लिमिटेड कंपनीकडे पुणे मनपाने 2016 साली मनपा हद्दीतील दहा लाख मिळकतींचे जीआयएस
मॅपिंग करण्याचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट सायबर टेक या कंपनी सोबत दिले होते. हे
काम 6 महिने मुदतीत पूर्ण करणे अपेक्षित असताना देखील त्याला तब्बल 2 वर्षाचा अवधी
लावला. त्यातही कामांमध्ये अनेक चुका केल्या. प्रत्यक्ष या कामासाठी 2162 माणसे
एकाच वेळी कार्यरत असणे अपेक्षित होते परंतु आम आदमी पक्षाने केलेल्या पाहणीत असे
आढळून आले की सार आयटी रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जुलै 2016 ते जून
2018 या कालावधीत सरासरी प्रति महिना केवळ 150 कामगारांचा पीएफ भरलेला आहे. याचाच
अर्थ असा की अतिशय सदोष पद्धतीने प्रत्यक्ष साईट विजिट न करता कार्यालयामध्ये बसून
हा जिओ मॅपिंग सर्वे करण्यात आला. या कंपनीचे काम केवळ सॉफ्ट कॉपी मध्ये
डॅशबोर्डवर दिसत असून प्रत्यक्ष भेट निरीक्षक विभागीय निरीक्षक यांना सर्व आवश्यक
कागदपत्रे सादर केलेली नाहीत असे कर आकारणी व कर संकलन कार्यालयाने आयुक्त
कार्यालयाला 26 जुलै 2018 रोजी कळवले होते. असे असून देखील उप कामगार अधिकारी
प्रवीण गायकवाड यांनी संबंधित कंपनीने सर्व कामगारांचे ईपीएफ, ईएससाय भरल्याचे खोटे अभिप्राय देऊन या
कंपनीची कोट्यावधी रुपयांची बिले काढण्यास मंजुरी दिली. राजकीय आशीर्वादाने हे घडत असणार हे उघड सत्य
आहे. हे सर्व प्रकरण आम आदमी पक्षाचे प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी 14 फेब्रुवारी
2022 रोजी पत्रकार परिषद घेऊन उघडकीस आणले होते.
तरीही या कंपनीला काळ्या यादीत टाकण्या ऐवजी फेब्रुवारी 2022 मध्ये पुणे शहरातील होर्डिंग्ज मॅपिंग करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ज्या कंपनीने ट्री सेन्सस, जिओ मॅपिंग ऑफ प्रॉपर्टी या प्रकरणात गैरव्यवहार केले त्यांना आता होर्डिंग्ज मॅपिंगचे टेंडर दिलेले आहे. पुणे महानगरपालिकेतील या भ्रष्टाचाराविरोधात आम आदमी पक्ष आक्रमक मोहीम उघडणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.......!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84