Type Here to Get Search Results !

एकनाथ शिंदे यांचे बंड बारामती लोकसभा मतदार संघालाही देणार हादरे; शिवतारे, कोंडे, आढळराव, हर्षवर्धन पाटील यांचा घेरा

 


पुणेदि.२२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्रात मागच्या एका महिन्यात झालेल्या राजकीय भुकंपाचे हादरे अजूनही शिवसेनेला बसत आहेत. एकनाथ शिंदे  यांच्यासोबत शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार आणि १९ पैकी १२ खासदार गेले आहेत. याशिवाय माजी नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारीही शिंदे गटात सामील होत आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे शिवसेनेच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेससमोरही अडचण निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातून एकनाथ शिंदेंसोबत जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे २०२४ साली सुप्रिया सुळेंसाठी बारामतीची जागा कठीण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सहा विधानसभा मतदार संघ आहेत, ज्यात बारामती शह, दौंड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला आणि भोर यांचा समावेश आहे.

२०१४ साली मोदी लाटेमध्ये सुप्रिया सुळे ५० हजार मतांनी निवडून आल्या, पण २०१९ साली त्यांची आकडेवारी दीड लाखांनी वाढली. भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल  यांची पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीमधून उभ्या होत्या. २०१९ ला सुप्रिया सुळेंना बारामती शहरातूनच मोठी आघाडी मिळाली. सुप्रिया सुळेंना बारामती शहरात जवळपास पावणेदोन लाख मतं मिळाली, तर कांचन कुल यांना फक्त ४७ हजार मतं पडली.

बारामतीनंतर सुप्रिया सुळेंना सगळ्यात मोठं मताधिक्य इंदापूरमधून मिळालं. सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये १,२३,५७३ तर कुल यांनी ५२,६३५ मतं घेतली. भोरमध्ये सुप्रिया सुळेंना १,०९,१६३ आणि कांचन कुलना ९०,१५९ मतं मिळाली. पुरंदरमध्ये सुळेंनी १,०४,८७२ आणि कुल यांनी ९५,१९१ मतं घेतली. तर खडकवासलामध्ये सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला, या भागातून त्या ६५ हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या. तर दौंडमध्येही त्यांना कुल यांच्यापेक्षा ७ हजार कमी मतं मिळाली. कुल यांनी ९१,१७१ तर सुप्रिया सुळे यांनी ८४,११८ मत घेतली.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे बारामती वगळता इतर 5 विधानसभा क्षेत्रांमधली राजकीय गणितं बदलली आहेत, ज्यासाठी राष्ट्रवादी आणि सुप्रिया सुळेंना आतापासूनच मोर्चेबांधणी करावी लागू शकते.

इंदापूरमधून काँग्रेसचे माजी मंत्री आणि दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. २०१९ निवडणुकीत काँग्रेसमध्ये असताना हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे सुळेंना इंदापूरमध्ये महत्त्वाची आघाडी मिळाल्याचं बोललं जातं. पण विधानसभेवेळी हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर फक्त ३ हजार मतांनी पराभव झाला. यावेळी इंदापूरमध्ये आघाडी घेणं सुप्रिया सुळेंसाठी आव्हानात्मक असेल.

पवारांचे कट्टर विरोधक मानले जाणारे पुरंदरचे विजय शिवतारेदेखील एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. २०१९ निवडणुकीमध्ये शिवतारेंचा काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभव केला. पुरंदर विधानसभा मागच्या बऱ्याच काळापासून पवारांच्या ताब्यात आलेली नाही. तसंच शिवतारे हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समजले जातात.

बारामती लोकसभेमध्ये येत असलेल्या दौंड मतदारसंघामधून राहुल कुल हे २०१४ आणि २०१९ साली भाजपच्या तिकिटावर निवडून आले. एकेकाळी पवार कुटुंबाच्या जवळ असणारे राहुल कुल आता देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कुल यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. २०१९ ला या मतदारसंघातून सुप्रिया सुळे पिछाडीवर होत्या.

भोर मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना छोटी आघाडी मिळाली. या मतदारसंघात काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळेंना आघाडी मिळवून देण्यात मोठी मदत केली, पण २०२० नंतर थोपटे आणि पवार यांच्यातले संबंध खराब झाल्याचं बोललं जातं. नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, यानंतर या पदासाठी संग्राम थोपटे यांचं नाव आघाडीवर होतं. पण महाविकासआघाडी सरकार असताना परत विधानसभा अध्यक्षाची नेमणूकच झाली नाही. थोपटे समर्थकांनी यासाठी शरद पवारांना जबाबदार धरलं. थोपटेंची नाराजी अशीच कायम राहिली, तर याचा फटका सुप्रिया सुळेंना लोकसभा निवडणुकीत बसू शकतो.

बारामतीमधला शेवटचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या खडकवासलामध्ये राष्ट्रवादी सगळ्यात कमकुवत आहे. सुप्रिया सुळे या भागात २०१९ ला ६५ हजार मतांनी पिछाडीवर होत्या. विधासनभा निवडणुकीतही भाजपचा खडकवासलामध्ये विजय झाला.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाचं राजकीय गणित पूर्णपणे बदललं आहे, त्यामुळे दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार, हे निश्चित मानलं जात आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.