पुणे, दि.१५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज शुक्रवार दि. १५ जुलै २०२२ दुपारी अडीच वाजता सिंहगड रस्ता येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी भेट देणार आहेत. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर चौक येथे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन स्थानिक नागरिकांच्या समस्याही त्या जाणून घेणार आहेत.
शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या सिंहगड रस्त्यावरील (नरवीर
तानाजी मालुसरे रस्ता ) वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राजाराम पूल ते फन टाइम थिएटर
दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. हा पूल निर्माणाधिन असून पुलाची लांबी
अडीच किलोमीटर असणार आहे. त्यानुसार, दोन टप्प्यांत हा पूल उभारण्यात येणार आहे. पुलाचे काम सुरू
झाल्यानंतर आता सिंहगड रोडवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रंचड मोठ्या वाहतुक
कोंडीचा सामना करावा लागत आहे.
माणिकबाग ते आनंदनगरपर्यंत असणारा रस्ता हा पुलाच्या
कामामुळे अरुंद झाला आहे यामुळे आता सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळेला प्रचंड मोठी
वाहतूककोंडी होत आहे. याचा नागरिक, अबाल-वृद्धांना तसेच रुग्णांना त्रास होत आहे. याची खबरदारी
म्हणून काम सुरू करण्याआधीच वाहतूक व्यवस्थेत योग्य ते बदल करून पर्यायी मार्ग
बनवून त्याबद्दल जनजागृती करणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात महापालिका प्रशासन
आणि वाहतूक विभाग सपशेल अपयशी ठरलेले दिसत आहेत.
दरम्यान, मधल्या काळात आम आदमी पार्टीचे खडकवासला विधानसभा मतदार
संघाचे अध्यक्ष श्रीकांत चांदणे यांनी आंदोलनाचा इशारा देत, या पुलाचे काम
फक्त रात्रीच्या वेळी करावे आणि दिवस वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची
मागणी केली होती. त्यापूर्वी या पुलाचा निधी परत जातो म्हणून पुणे महानगरपालिकेचे
तत्कालीन विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता. तर अनेक
राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना या रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या दिरंगाईमुळे त्रस्त
झालेले असून, खासदार सुप्रिया
सुळे यांच्या भेटीमुळे यामध्ये काय बदल होतात?, किती नागरिक आपली निवेदने प्रत्यक्ष जागेवर येऊन देतात?, कितीजण सुप्रिया
सुळे यांची भेट घेतात? राज्यातील सत्ता
बदलल्यानंतर पालिकेतील अधिकारी कर्मचारी या भेटीला कसे सामोरे जातात? हे पाहणे
औत्सुक्याचे ठरणार आहे.
या भागात राष्ट्रवादीवर उमेदवार शोधण्याची वेळ
खासदार सुप्रिया सुळे या ज्या चौकात भेट देऊन पाहणी करणार
आहेत, त्या आनंदनगर
चौकाच्या दोन्ही भागात भाजपाचे नगरसेवक आहेत. मोदी लाटेत या भागातील राष्ट्रवादीचा
सुपडा साफ झाला. तो असा झाला की आता या भागात राष्ट्रवादीला उमेदवार शोधणे कठीण
झाले आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी
शहरभर दौरा करून इच्छुक उमेदवारांच्या भूमिका जाणून घेतल्या. त्यातील जगताप यांचा
या भागातील दौरा सपशेल अपयशी ठरल्याच्या चर्चा शहरभर आहेत. त्यामुळे आगामी पुणे
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघासह, खडकवासला
विधानसभा मतदार संघातील या प्रभागात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी खुद्द खासदार
सुप्रिया सुळे यांच्याकडून प्रयत्न चालू झाल्याचे त्यांच्या या भेटीतून समोर येते
आहे.
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes