पुणे, दि.१९ डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभाग आणि वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह विभाग, अतिक्रमण विभाग यांच्या माध्यमातून आज वारजे जकात नाका येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते वारजे हायवे येथील स्व सोनेरी आमदार रमेश वांजळे चौकापर्यंत संयुक्त कारवाई करून ६ हजार ८० चौरसफूट अतिक्रमित क्षेत्र मोकळे केले. तर वारजे हायवे चौक ते गणपती माथा भागात लवकरच तडाखेबाज कारवाई केले जाणार असल्याचे संकेत काही अधिकाऱ्यांकडून मिळाले आहेत.
सदरील अनधिकृत पत्राशेड आणि बांधकामे हटविणे
संदर्भात बांधकाम विकास विभागाकडून संबधितांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.
मात्र त्या नोटिशीकडे सारासार दुर्लक्ष्य करून ही पत्राशेड आणि बांधकामे संबंधित
मालकांकडून हटवण्यात आली नव्हती. त्यामुळे बांधकाम विकास विभागाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता श्रीकांत
वायदंडे, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक
आयुक्त राजेश गुर्रम यांच्या मार्गदर्शनाखाली, बांधकाम विभागाचे उपअभियंता निवृत्ती
उथळे, कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे, अजित
ववले, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभागाचे परवाना
निरीक्षक श्रीकृष्ण सोनार, आकाशचिन्ह परवाना निरीक्षक वेदांत पोकळे यांच्या पथकाने
३ ट्रक, 2 जेसीबी, 1 गॅस कटर, 10 कर्मचारी, 6 पोलीस, 4 सुरक्षा रक्षक यांच्या सहाय्याने ही कारवाई केली.
साधारणपणे दोन आठवड्यांपूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते हायवे चर्च या
कॅनॉल रस्त्यावरील अनधिकृत पत्राशेड आणि फ्रंट मार्जिनवर याच तिन्ही विभागांच्या
संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली होती. त्यात बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित
बॉम्बे चॉव हॉटेलच्या मागे बेकायदेशीररित्या मारण्यात आलेल्या पत्राशेडसह अनेक
खाजगी आणि व्यावसायिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा
या तिन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ही कारवाई
करण्यात आली. मात्र मागच्यावेळी प्रमाणे ही कारवाई अचानक न होता, एकदिवस अगोदरच या
कारवाईची कुणकुण लागल्याने अनेक व्यावसायिकांनी खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळाले.
त्यामुळे या रस्त्यावरील बहुचर्चित पुजा फर्निचर’सह २० मिळकतींचे फ्रंट मार्जिन
मधील अतिक्रमण नष्ट करण्याबरोबरच, ६ अनधिकृत फ्लेक्स, २ लॅाली पॉप फलक, ५ लाकडी पहाड जप्त करण्यात
आले.
यापूर्वी आकाशचिन्ह विभागाची कारवाई करत असताना, बेकायदेशीर लावण्यात
आलेल्या फक्त फ्लेक्सवर कारवाई केल्या जात होत्या. त्यामुळे मांडववाल्यांचे पहाड
सुरक्षित राहत असल्याने, त्यांच्याकडून पुन्हा फ्लेक्स लावून शहराच्या बकालपणात
वाढ होत होती. यावर उपाय म्हणून अशा पहाडांची लाकडे कापण्यासाठी मशीन घेण्यात
आलेली असून, आता इथून पुढे फक्त फ्लेक्स जप्त होणार नाहीत, तर ते लावण्यात आलेल्या
मांडवाच्या साहित्याची देखील खांडोळी करण्यात येणार असल्याचे महापालिका सहायक
आयुक्त राजेश गुर्रम यांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले.
एकूणच गेल्या २० दिवसात आणि त्यापूर्वी अनेक वेळा वारजे हायवे चौकापर्यंतच पुणे महानगरपालिकेच्या कारवाई झाल्या. मात्र कारवाईची खरी आवश्यकता वारजे हायवे चौकापासून गणपती माथ्यापर्यंत आहे. या भागात नित्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याची समस्या सर्वांची आणि सर्वश्रुत आहे. त्यामुळे या भागावर पुणे महानगरपालिकेची विशेष कृपा का? नागरिकांना त्रास होणाऱ्या भागाकडे दुर्लक्ष्य करून, नागरिकांना त्रासात ठेऊन, जिथे कोणाला काही त्रास नाही अशा ठिकाणांवर कारवाई करण्यामागे काय गौडबंगाल आहे? असा प्रश्न वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला जात होता. त्याचे उत्तर आजच्या कारवाई मध्ये समोर आले असून, लवकरच वारजे हायवे चौक ते गणपती माथा भागात तडाखेबाज कारवाई करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रशासक राज प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.