पुणे, दि.17 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पुण्यात होणार असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांमध्ये पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील मल्लांची अधिकृत निवड चाचणी वारजे मधील पुणे महानगरपालिकेच्या काम सुरु असलेल्या कुस्ती संकुलामध्ये पार पडणार आहे. त्याचे उद्घाटन आज शनिवार दि.17 डिसेंबर २०२२ सायंकाळी ४ वाजता होणार असून, उद्या रविवार दि.१८ डिसेंबर २०२२ पर्यंत या अधिकृत निवड चाचण्या पार पडणार असल्याचे पुणे शहर कुस्तीगीर संघाचे पुणे शहर अध्यक्ष आणि मॅट वरील पहिले हिंदकेसरी अमोल बराटे यांनी 'चेकमेट टाईम्स'शी बोलताना सांगितले.
वारजे मधील मुठा नदीच्या कडेला स्मशानभूमी शेजारी असलेल्या या कुस्ती संकुलाचे २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०१९ ला खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले आहे. याला आता ४ वर्ष होत आली आणि या चारही वर्षात पुणे महानगरपालिकेतील दोन नंबरचे पद म्हणजे विरोधी पक्षनेतेपद वारजे कडे होते. तरी देखील हे कुस्ती संकुल अद्याप पूर्णत्वाकडे गेलेले नाही, हे पुणे शहर आणि जिल्ह्यातील मल्लांचे आणि कुस्ती प्रेमींचे दुर्दैव म्हणावे लागेल.
मात्र असे असले तरी पुणे शहर कुस्तीगीर संघाचे पुणे शहर अध्यक्ष आणि मॅट वरील पहिले हिंदकेसरी अमोल बराटे, त्याचबरोबर पुणे जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र केसरी आणि रुस्तम ए हिंद अमोल बुचडे यांनी विशेष प्रयत्न करून वारजे मधील या कुस्ती संकुलात अधिकृत निवड चाचण्या घेऊन, या कुस्ती संकुलाला प्रकाशात आणण्याचे काम केले आहे. मात्र आता या पार्श्वभूमीवर मॅट वरील पहिले हिंदकेसरी राहत असलेल्या वारजे मधील पुणे महानगरपालिकेच्या या कुस्ती संकुलाला पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली आहे.
भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचे दोन वर्षांपूर्वी याच महिन्यात, अर्थात १४ डिसेंबर २०२० ला वयाच्या ८६ व्या वर्षी कोल्हापुरात निधन झाले. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जाते आणि वारजे मधील हे कुस्ती संकुल कोल्हापूरला जोडणाऱ्या हायवेच्या बाजूलाच आहे. त्यामुळे या कुस्ती संकुलाला हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे नाव दिले गेल्यास कोल्हापूरचे पुण्याशी संबंध आणखीन घनिष्ठ होण्यास मदत होईल, हे दुसरे योग्य कारण आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा हे श्रीपती शंकर खंचनाळे यांचे मूळ गाव. १० डिसेंबर १९३४ रोजी खंचनाळे यांचा जन्म झाला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीपती खंचनाळे यांना लहानपणापासूनच शारीरिक कसरती आणि कुस्तीची आवड होती. याच आवडीतून त्यांनी बालवयातच कोल्हापुरातील शाहुपुरी तालीम गाठली आणि आपला कुस्तीचा सराव सुरु केला. त्यावेळचे मल्ल मल्लाप्पा फडके आणि विष्णू नागराळे यांचा विशेष प्रभाव खंचनाळे यांच्यावर होता. १९५० पासून खंचनाळे यांनी कुस्तीला गांभीर्याने घेतलं आणि त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये ते विजयी झाले. १९५९ मध्ये पंजाब केसरी बच्चा सिंग याला पराभूत करत श्रीपती खंचनाळे यांनी पहिला हिंदकेसरी किताब पटकावला आणि सगळ्यात कुस्ती विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले, अशा या महान विभूतीचे नाव वारजे मधील कुस्ती संकुलाला दिले गेल्यास, या कुस्ती संकुलाचे नाव देशभरात होईल यात तिळमात्र शंका नाही.
दरम्यान, तत्कालीन प्रसिद्ध मल्ल आनंद शिरगावकर यांना त्याच वर्षी खंचनाळे यांनी कराड इथल्या मैदानात दोन मिनिटात आस्मान दाखवले आणि महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. पुढे १९६५ मध्ये त्यांनी ऑल इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धाही जिंकली. श्रीपती खंचनाळे यांनी कुस्तीमध्ये आपला वेगळा दरारा निर्माण करुन मानाचे स्थान मिळवले होते. वयाच्या सातव्या वर्षांपासून कुस्ती खेळायला सुरु करणारे श्रीपती खंचनाळे वयाच्या ५६ व्या वर्षापर्यंत मैदानात शड्डू ठोकत होते. या काळात त्यांनी अनेक मल्लही घडवले आणि वारजे मधील या कुस्ती संकुलात देखील माल घडवले जाणार आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या या कुस्ती संकुलाला पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचे नाव सुयोग्य असेच असणार आहे.
काळानुसार कुस्तीच्या खेळातील बदलांकडेही खंचनाळेंनी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले. त्यांना क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील आणि विशेषतः कुस्तीच्या क्षेत्रातील मार्गदर्शक असे छत्र हरपल्याचे बोलले जात असताना, त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी कोल्हापूरशी जोडणाऱ्या महामार्गावर या मनाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांची अधिकृत निवड चाचणी होत असताना, त्यांच्या नावाचा उल्लेख येणे तितकेच महत्वाचे वाटते. पुणे महानगरपालिका यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धांमध्ये पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचे नाव या कुस्ती संकुलाला जाहीर करून खंचनाळे यांना मानवंदना तर देऊ शकतेच. मात्र प्रशासक राज असलेली पुणे महानगरपालिका याबाबत प्रत्यक्ष काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84