Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, election campaign, election news, political news, business news, Marathi news today
पुणे, दि.१० ऑक्टोबर २०२४
(Checkmate Times): भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत मूळव्याधीवर उपचार
करणाऱ्या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच आता वारजे माळवाडी
मध्ये एक बोगस डॉक्टर गेल्या २२ वर्षांपासून मूळव्याधीवर उपचार करत असल्याची
धक्कादायक बाब समोर आली आहे. शासनाने बोगस डॉक्टरांच्या विरोधात सुरु केलेल्या मोहिमेने
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक बोगस डॉक्टरांचा बुरखा फाटला आहे. मात्र त्यांना
बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्यांपर्यंत पोचण्यात पोलिसांना अपयश आल्याचे दिसते आहे.
त्याचबरोबर वर्षानुवर्षे हे बोगस डॉक्टर राजरोस धंदा करत असताना, ज्यांच्याकडे अशा
लोकांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असते त्या आरोग्य विभागातील
कोणाचेही याकडे लक्ष कसे गेले नाही? यावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या
मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण यांच्या अहवालावरून, सहाय्यक आरोग्य
अधिकारी आणि अँटी-बोगस डॉक्टर्स सेलचे प्रभारी डॉ. राजेश दिघे यांच्या आदेशावरून
बोगस डॉक्टरांच्या विरोधी कक्षाने मंगळवार दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी वॉर्ड मेडिकल
ऑफिसरला (डब्ल्यूएमओ) महाराष्ट्र मेडिकलचे उल्लंघन करून वैद्यकीय परिषदेकडे आवश्यक
पात्रता आणि नोंदणीशिवाय क्लिनिक चालवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे
आदेश दिले होते. त्यानंतर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी
वारजे माळवाडी पोलीस ठाणे मध्ये वारजे माळवाडी मधील या बोगस डॉक्टर विरोधात
अहवालासह तक्रार दिली होती. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविण
पाटील, परिमंडळ ३ चे पोलीस उप-आयुक्त संभाजी कदम, कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली
वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख, पोलिस अंमलदार रामदास
गोणते, अतुल भिंगारदिवे, रविंद्र गाडे,
रणजित पाटील आणि महिला पोलीस शिपाई अबोली किंद्रे यांच्या पथकाने माहिती
मिळालेल्या ठिकाणी धाड टाकली.
यावेळी आनंद हॉस्पिटल
आणि प्रसूतिगृह,
श्रीकृष्ण पॅलेसच्या मागील बाजूस एका जुन्या चाळीत मुळव्याध उपचार
केंद्र नावाने चालू असलेल्या या बोगस डॉक्टरच्या दवाखान्याचा शोध घेवून, अचानकपणे
छापा टाकून डॉक्टरास रंगे हाथ व्यवसाय करताना पकडले. यावेळी त्याच्याकडे चौकशी
केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला प्राप्त
अहवालावरून विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले शिक्षण नववी झाले
असल्याचे कबुल करत, बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे रोगनिदान आणि उपचार करत असल्याचे
कबुल केले. त्यानुसार सदर बोगस डॉक्टर बिभूती बिमल बागची (वय ४३, रा. रार्व्हे ५८,
गुरु निवास, सहयोग नगर, वारजे माळवाडी, पुणे, मूळ पश्चिम बंगाल) याच्यावर मुळव्याध
उपचार केंद्र नावाने दवाखाना चालू करुन (N.D.) (B.E.M.S) (N.D.) ही पदवी घेतली असल्याचे भासवून महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन
यांच्याकडून मान्यता प्राप्त शैक्षणिक अर्हता प्राप्त न करता, बनावट सर्टिफिकेट सादर करुन नोंदणी करुन व्यवसाय करित असल्याचे मिळून आला
असल्याने वारजे पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून, त्याला अटक करण्यात आली आहे.
त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली असून, पोलीस हवालदार अतुल
भिंगारदिवे पुढील तपास करत आहेत.
उदगीर मध्ये बोगस
डॉक्टर कडून अवैध गर्भपात
उदगीर परिसरात अवैध
गर्भपात होत असल्याच्या घटना घडत असल्याची चर्चा चालू होती. या पार्श्वभूमीवर
येथील सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, शहर व ग्रामीण पोलिस अधिकारी
पाळत ठेवून येथील बनशेळकी रोडवर असलेल्या एका बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यात एका
पिडीत महिलेचा गर्भपात करत असताना रंगेहात पकडून त्यास ताब्यात घेण्यात आल्याची
घटना समोर आली होती. यावेळी गर्भपात करणारा डॉ इरफान शमशोद्दीन मोमीन (रा.बाबा नगर,
निडेबन) याची चौकशी केली असता त्याच्याकडे कसलेही वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्र
नसल्याचे निष्पन्न झाले होते. सदरील पीडीत महिलेस पुढील उपचारासाठी उपजिल्हा
रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनास्थळावरून रक्ताचा स्त्राव, गर्भपात गोळ्या, औषधी, इंजेक्शन,
सलाईन आधी ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले होते.
मावळात तीन बोगस
डॉक्टरवर गुन्हे दाखल
रुग्णांच्या घरी जाऊन
विनापरवाना उपचार करत असलेल्या आंदर मावळातील तीन बोगस डॉक्टरांवर टाकवे आरोग्य
केंद्रातील भरारी पथकाने धाड टाकली होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे
लेखी पत्र आरोग्य विभागाने वडगाव पोलिसांना दिले होते. आंदर मावळातील अनसुटे,
इंगळून, खांडी या गावात हे बोगस डॉक्टर राहत
होते. त्याबाबतची तक्रार एका संस्थेने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई
यांच्याकडे केली होती. त्यानुसार, टाकवे बुद्रुक येथील
आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.
राजू तडवी, ज्ञानेश्वर राऊत, अजीम शेख
या पथकाने धाड मारली होती.
नागपूर मध्ये देखील
बोगस डॉक्टर गजाआड
वैद्यकीय सेवा करण्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र सादर करून दवाखाना चालवणाऱ्या
बोगस डॉक्टरविरोधात जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात
नागरिकांनीदेखील तक्रारी केल्या होत्या. मनोजकुमार हरीराम हनवते (आंबाटोली, समतानगर झोपडपट्टी)
असे आरोपीचे नाव आहे. तो मागील सहा वर्षांपासून दवाखाना चालवत होता. त्याने वैद्यकीय व्यवसाय करण्याबाबतचे प्रमाणपत्र, छत्तीसगड येथील आयुष व आरोग्य विद्यापीठातून बीएएमएस
पदवी २०१८ साली पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दाखवले होते. त्याच्याकडे सेंट्रल
कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन व महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन येथे २०२१ साली
नोंदणी केल्याचे देखील प्रमाणपत्र होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत हनवते
याच्या प्रमाणपत्रांची मुंबईच्या महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन
कार्यालयातून पडताळणी केली. त्यावेळी त्याचे प्रमाणपत्र बनावट असल्याची बाब समोर
आली. तो त्याच्या आधारावर वैद्यकीय व्यवसाय करत होता.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा.
खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share